कोकणातील धगधगते वास्तव..




आशिष बल्लाळ यांनी परखडपणे लिहिलेला हा लेख... वाचायलाच हवा.

कोकणातील तरुणांना रोजगाराच्या संधी यावर नेहमी चर्चा केली जाते. तरुणांचा रोजगार हा कोकणातील विविध निवडणुकामध्ये महत्वाचा विषय असतो. याच ‘रोजगाराच्या संधी’ या विषयावर आज थोडं परखडपणे मत मांडणार आहे. 

दोन महिन्यापुर्वी रेल्वेमधुन मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करीत असताना एक ओळखीच्या तिकिट तपासणीसासोबत गप्पा मारीत होतो. गप्पांच्या ओघात ते म्हणाले गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये फक्त रेल्वेने एक ते दिड लाख परप्रांतिय कामगार आम्ही पनवेलपर्यंन्त सोडली. एक ते दिड लाख कामगार फक्त रत्नागिरी रेल्वेस्टेशनवरुन सोडले गेले असतील तर आपल्या ‘ रत्नसिंधु’ मधुुन किती कामगार गेले असतील ? बरं हे फक्त रेल्वेने बाकी खाजगी वाहने, एस.टी.बसेस यांचा आकडा वेगळाच आहे. म्हणजे हे सगळे कामगार आपल्या कोकणात येवुन आपले पोट भरत होते आणि आता पोट भरत आहेत. यात या कामगारांची चुक काहीही नाही. लोकं काय म्हणतील याचा कसलाही विचार न करता, न लाजता ही माणसे कोकणातील चिरेखाणी, आंब्याच्या बागा सांभाळणे, रस्त्यावरची कामे, बांधकाम क्षेत्र, मासेमार बोटीवर खलाशी, बेकरी उत्पादने, राजस्थानी हॉटेल,टायर पंक्चर अशी विविध कामे करतात. यातील बहुसंख्य लोक हे काही वर्षातच कोकणात जमिनी खरेदी करुन घ स्वत:ची घरे बांधुन, बागायती करुन कोकणात स्थायिक होतात. यामागे त्यांची मेहनत आहे हे मान्य करायला हवे. पण हे सगळे रोजगार आपल्या कोकणी भुमिपुत्रांचे होते. हे रोजगार त्यांनी बळकावले नाहीत तर आपल्या सुशिक्षित तसेच कमी शिकलेल्या मुलांनी मुंबई पुण्याचे रस्ते धरुन या लोकांकडे ते सुपुर्द केले आहेत. जर हि बाहेरुन येणारी माणसे हे व्यवसाय, कामे करु शकतात तर आपण का करु शकत नाही?  

कोकणात रोजगाराचा प्रश्न आहे  प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सापडते. गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये आपण कोकणच्या दैनंदिन जीवनाचा विचार केला तर परजिल्ह्यातुन आपल्याकडे लाखो लिटर गायी म्हैशीचे दुध, शेकडो टन भाज्या, शेळ्या, कोंबडया दैनंदिन जीवनात कमी पडत होत्या. आपल्याकडील बहुसंख्य प्रमुख नद्या या बारमाही वाहतात किंवा डोहाच्या माध्यमातुन त्यात पाणी साचलेले असले. या पाण्याचा उपयोग करुन किमान कोकणातल्या वातावरणात, जमीनीत उगवणा-या भाज्यांचे उत्पन्न पडीक जमीनीत घेवु शकतो. या नद्यांच्या दोन्ही बाजुंना पाण्याचा योग्य वापर करुन शेतीचे नवे पर्व कोकणात येवु शकते. बचत गटाच्या माध्यमातुन कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालनासारखे उद्योग लाखोंची उलाढाल करु शकतो. कोकणात सहकार वाढला नाही पण सहकाराच्या माध्यमातुन एखादा दुध डेअरी सारखा प्रकल्प शेकडो जणांना नोकरी देईल व त्यासोबतच पशुपालनाचे प्रमाण वाढुन त्याच्यामाध्यमातुनही रोजगार उपलब्द् होवु शकतो. 

कोकणातील शासकिय नोकरींमध्ये कोकणी तरुणांमध्ये कमालीची अनास्था आहे. विविध पदभरतीत कोकणी तरुण मागे पडतात.सुयोग्य नियोजित अभ्यास करुन आपण ह्या पदांवर नोक-या मिळवु शकतो मी ती मिळवली आहे.

माझे आजोबा म्हणायचे की ,एका नारळाच्या झाडाने फळधारणेेेला सुरुवात केली की घरातला एक व्यक्ति कमावती झाली. कोकणात काही ठरावीक लोकांनाच या बागायतीचे अर्थकारण समजले. ज्यांना समजले त्यांची आर्थिक स्थिती आज स्थिर आहे.कोकणात शेकडो एकर जमीनी या भाऊबंदकीच्या वादातुन पडीक आहेत. हे वाद सामंजस्याने मिटवुन या पडीक जमीनींचा बागायतीसाठी योग्य वापर करायला हवा. आपल्याकडे आंबा, काजु, चिकु, पेरु,नारळ, पपई, पोफळी अशी ‘ श्रीमंत’ फळे मिळतात. ज्यांचे आजचे बाजारातील दर पाहीले तर डोळे पांढरे होतात. आपल्याकडे स्वयंपाकात लागणा-या मसाल्यांची झाडांची वाढ चांगली होते. कोकणातल्या घराशेजारी किंवा शेताच्या बांधावर शेवग्याचे  झाड असते. आपण शेवग्याचा त्याचा उपयोग वरचेवर करतो पण त्याला व्यावसायिक रुप देवुन  बागायती केली तरमोठया प्रमाणात उत्पन्न मिळु शकते. शेवग्याच्या शेंगेचा आजचा बाजारी दर कमीत कमी पाच रु.एक नग आहे.लिंबुचाही बरेचदा दर हाच असतो.  आपल्या चिपळुणच्या गांग्रई मध्ये पुष्कर चव्हाण नावाचा तरुण स्ट्रॉबेरीचे पिक घेतोय तर संगमेश्वरचा शुभम दोरकडे कलिंगड, कोबी, झेंडूचे प्रयोग यशस्वी करतोय. आपल्याकडे जगातला  महागड्या काळा तांदूळ होतो त्याची शेती दापोलीतला अभिषेक सुर्वे नावाचा तरुण अभियंता करतोय.आपल्याकडे दुर्मिळ लाल तांदळाची भातशेती संगमेश्वच्या साखरपा परिसरातील महिला बचत गटाच्या माध्यमातुन करतात.आच-यातला सुशांत सावंत लाल तांदळाचा ब्रँन्ड तयार करतोय. अशा प्रकारच्या बागायतीच्या माध्यमातुन कृषिपर्यटनालादेखील वाव आहे. 

सिंधुदुर्गातल्या आसोली गावात सुरंगीची फुले मिळतात. केवळ सुरंगीच्या फुलांपासुन कोट्यावधीची उलाढाल या गावात होते. म्हणजेच जे देशात पिकत नाही ते सर्व आपल्या कोकणात पिकत असेल तर दुस-याच्या कंपनीत मेहनत करण्यापेक्षा आपल्याच शेताच्या बांधावर मेहनत करायला काहीच हरकत नाही.

कोकणाला निसर्गाने भरभरुन दान दिले आहे. याचा उपयोग आपण कोकण पर्यटनासाठी करायला हवा. पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सोयी सुविधा, प्रशिक्षणे घेवुन पर्यटनव्यवसायात पाऊले टाकायला हवीत. आपल्याकडील नितांत सुंदर समुद्रकिनारे, खाडया, नदया, ओढे, धबधबे, बंदरे, धरणे, कातळशिल्पे, किल्ले, मंदिरे, लेण्या, जैवविविधता, परंपरा यांना हानी न पोहोचवता यापासुन आर्थिक उत्पन्न मिळवायला हवे. पर्यटनासोबतच आपोआप हॉटेल, खानावळी,ट्रान्सपोर्ट, लॉज यांसारखे व्यवसाय आपोआप वाढतात व पर्यायाने रोजगार उपलब्द् होतो.  पर्यटनावर आधारीत व्यवसाय कसा करावा हे माझ्या सिंधुदुर्गाचा सिंधुरत्न प्रसाद गावडेच्या युटयुब, फेसबुक पेजच्या माध्यमातुन तुम्ही पाहू शकता. कोकणात चौपदरी रस्ता, दुपदरी रेल्वेमार्ग, विमानसेवा व जलवाहतुकीच्या माध्यमातुन कोकण पर्यटनाला चांगले दिवस येवुन कोकणात पर्यटन रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्द् होणार आहेत.

पर्यटनासोबत कोकणात सध्या प्री विडिंग फोटोशुट, वेडिंग डेस्टिनेशन्स चे प्रमाण वाढत आहे. देशविदेशातुन फक्त गळाने मासे पकडण्यासाठी हौशी मासेमार कोकणातीी खाड्या, समुद्रात येत आहेत यामध्येही रोजगाराच्या संधी उपलब्द् होत आहे.

कोकणाकडे राजकारण्यांनीही तरुणांच्या रोजगाराच्या मुद्द्याकडे लक्ष दिले पाहीजे. केवळ राजकिय पदे न देता तरुणांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याकडे कल असला पाहीजे. नोकरीसाठी घरदार सोडून शेकडो किलोमिटर दूर जाणारे तरुण आणि त्यांची परत येण्याची रस्त्याकडे डोळे लावुन वाट बघणारे त्यांचे आईवडील यांच्या मनाचा विचार करायला हवा.  केवळ गावातील रस्ते व अन्य सोयी करुन कोकणचा विकास होईल असे नाही तर इथले दरडोई उत्पन्नही हे वाढले पाहीजे. इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार करुन इथे रोजगाराच्या संधी उपलब्द् कशा होतील व शासनदरबारी, बँका इ. ठिकाणी इथल्या तरुणांच्या, शेतक-यांची केली जाणारी अडवणुक कशी दूर करता येतील याकडे लक्ष द्यायला हवे.

कोकणातल्या नैसर्गिक शुद्ध हवेत आजारी माणुस ठणठणीत बरा होतो म्हणतात तर मग याचा वापर संपुर्ण महाराष्ट्रासाठी कसा होईल याचा विचार करायला हवा.
वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारे दवाखाने, मेडिटेशन सेंटर्स कोकणातील एखादया पडीक माळावर उभारायला हवीत जेणेकरुन महाराष्ट्रातल्या कानाकोप-यातल्या लोकांना शुद्ध हवेसोबतच चांगले उपचारही मिळतील. या हॉस्पिटल्स व मेडिटेशन सेंटर माध्यमातुन कोकणी माणसांना रोजगार उपलब्द् होईलच सोबत कोकणी माणसांची वर्षानुवर्षाची उपचारासाठी शेकडो कि.मी.ची पळापळ वाचेल.सोबत व्यावसायिक शिक्षणाच्या सोयी करायला हव्यात.

माझी आपल्या कोकणी माणसांना व तरुण मुलांना एकच कळकळीची विनंती आहे की, कोणतेही काम करताना कसलीही लाज बाळगु नका. आपल्याकडे काय पिकते व आपण काय विकु शकतो याचा विचार करा. पण काय विकते याचा विचार करताना आपल्या वाडवडीलांनी रक्त आटवुन कमावलेल्या जमीनी चार पैशासाठी आणि चार दिवसाच्या हौशेमौजेसाठी परप्रांतियांच्या घशात घालु नका. भुमिहिन होण्याचे दु:ख वेदनादायी असते. आपल्या पिढ्यानपिढ्याच्या जमीनी विकल्यात तर याच कोकणभुमीत एके दिवशी आपल्यासह येणा-या कित्येक पिढ्यांना आश्रयीत म्हणुन जगावे लागेल. 

#कोकणप्रेमीआशिष 🌴❤️
- आशिष प्रकाश बल्लाळ, रत्नागिरी
  मो.नं.९९६०३२५१७४
  ashishballal007@gmail.com
To Top