कोकण आणि नवीन वायनरी धोरण...!




कोकणात आंबा काजू फणस चिकू बागांमध्ये छोट्या वाईनरी सुरू करता येणे नवीन वायनरी धोरणाप्रमाणे शक्य. 

सर्वप्रथम नवीन वायनरी धोरणाचे समृद्ध कोकणच्या वतीने आम्ही स्वागत करतो. - संजय यादवराव

     द्राक्षसव आणि वाइन दोन्ही बनवण्याची पद्धत एकच.
फळांच्या रसापासून वाइन बनवली जाते. यात दहा टक्के अल्कोहोलचे प्रमाण असते. ज्याप्रमाणे द्राक्षासव औषधी आणि हेल्थ प्रॉडक्ट आहे. तशीच जगभर वाईन हे हेल्थ ड्रिंक समजले जाते. आपल्याकडे लिकर शॉप दारूच्या दुकानाला वाईन शॉप म्हणतात. आणि म्हणून अनेक जण वाईन ही दारू समजतात.

     जगात इटली, फ्रान्स ,अमेरिका, स्पेन ,जर्मनी ही सर्वात प्रगत राष्ट्र वाईन निर्मिती उद्योगात आहेत. आणि हिच राष्ट्र जगातली सर्वात मोठी पर्यटनाचे राष्ट्र आहेत . फ्रान्स आणि इटली या देशांमधील समुद्र किनारी कोस्टल भागामध्ये वाईन उद्योगाचे रिजन आहेत. जगातील सर्वात महागडी वाईन या भागांमध्ये फळांपासून बनवली जाते. यासोबत वाईन टुरिझम हा जगातील पर्यटनाचा लोकप्रिय प्रकार या देशामध्ये विकसित झाला आहे आहे. मी स्वतः फ्लोरेन्स या इटलीमधील प्रदेशात वाईन टुरिझमचां प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. चार तासाच्या टूरसाठी पाच हजार रुपये द्यावे लागले होते. आणि केवळ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन वायनरी पाहणे इतकाच कार्यक्रम या टूरमध्ये होता. राहण्या-जेवणाची सोय यातलं नव्हती. कोकणात पाच हजारांमध्ये तीन दिवसाची राहण्या-जेवणाची सोय होते.
येथे शेतकऱ्यांच्या बागांमध्ये छोट्या छोट्या वायनरी आहेत. येथे जगभरातील पर्यटक प्रत्यक्ष शेतावर जाऊन वायनरी पाहतात, आणि वाईन चा आनंद घेतात. वाईन बरोबरच शेतकऱ्याची अन्य उत्पादने विकत घेतात. वायनरीसोबत येथे कृषी आणि इकोपर्यटन  केंद्र विकसित केली आहेत. आणि त्यामुळे  हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या शेतात सन्मानाचा उद्योग आणि स्वयम रोजगार मिळतो. ज्या देशांमध्ये त्या त्या पर्यटन विभागानी  स्वतःचे वाईन चे ब्रँड विकसित केले आहे

        हे कोकणात सहज शक्य आहे. कोकण ही भारताची फळांची राजधानी आहे. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चा वायनरी उद्योग येथे विकसित होऊ शकतो. पण हा उद्योग कोकणात विकसित करताना अनेक धोरणात्मक अडचणी होत्या. दिवा धुरी यांनी जांभळापासून वाईन बनवण्याची उद्योग कुडाळमध्ये सुरू केला त्याला दहा वर्ष त्या उद्योगांना परवानगी मिळाली नाही.  कोकणातील वाईनला १००% एक्साईज कर, छोट्या वायनरी उद्योगासाठी परवानगी मिळण्याच्या असंख्य अडचणी, यामुळे कोकणात वायनरी उद्योग विकसित झाला नाही. याही परिस्थितीत प्रियंका सावे या एका उद्योजकिने हिम्मत करून आपल्या चिकू बागेमध्ये वाईनरी सुरू केली.
चार-पाच वर्षात फ्रुझांते हा तिचा वाइन ब्रांड अतिशय लोकप्रिय झाला. प्रियंका चिकू ,अननस ,आंबा मध या पासून वाईन बनवते. अशाच स्वरूपाची छोटी वायनरी आमदार शेखर निकम यांनी आणि दापोलीमध्ये माधव महाजन यांनी विकसित केली आहे.

कोकम सरबत, आगळ ,आंबा सरबत, पन्हे , काजू सरबत अशी आपली पारंपारिक फळ प्रक्रिया उत्पादने आहेत. जे अनेक उद्योजक कोकणांत करत आहेत. मात्र हे जागतिक प्रॉडक्ट नसल्यामुळे याला खूप मर्यादा आहेत. यातही खूप करायला हवे. पॅकेजिंग आणि दर्जा सुधारून चांगलं उत्पादनांचे ब्रँड विकसित करायला हवे.
      पण फळांपासून वाईन हा ग्लोबल प्रॉडक्ट आहे. हा सिद्ध झालेला व्यवसाय आहे आणि यातून पर्यटन वाढीला मोठी चालना मिळू शकते हे सुद्धा सिद्ध झाले आहे. आपल्या महाराष्ट्रात आणि देशात
कोकण ही फळांची राजधानी असल्यामुळे जागतिक दर्जाचा वाईन उद्योग कोकणात विकसित करता येणे शक्य आहे. याकरता कोकणातील शेतकऱ्यांनी तरुणांनी उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. हा उद्योग कोकण  प्रदेशात विकसित व्हावा याकरता समृद्ध कोकण समन्वयाचे  काम करणार आहे. इटली आणि फ्रान्स प्रमाणे कोकणाचे स्वतःचे वायनरी ब्रँड विकसित करता येतील आणि याचे एक्सपोर्ट जगभर करता येईल. कोकणात आत्ता एक कोटी पर्यटक येतात. मात्र उच्चभ्रू श्रीमंत पर्यटक कोकणात येण्यासाठी वायनरी टूरिझमचा प्रचंड उपयोग होऊ शकेल.

     या उद्योगाला सहजपणे परवानग्या मिळाव्यात म्हणून गेली आठ-दहा वर्ष माधव महाजन, प्रियांका सावे, किशोर धारिया आणि समृद्ध कोकण चळवळ आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत. आणि आता हा उद्योग कोकणात लघुउद्योग म्हणून करता येणे सोपे होईल.

     कोकणासाठी आवश्यक असलेले बदल नवीन धोरणाप्रमाणे झाले आहेत.

कोकणातील फळांपासून वाईन निर्मिती केली तर एक लिटर ला फक्त एक रुपया एक्साईज शुल्क राहणार आहे.
वीस पंचवीस लाख गुंतवणूक करून छोट्या वाईनरी विकसित करता याव्यात याकरिता आता दहा हजार लिटर क्षमतेचे साठी पाच हजार रुपये आणि पंचवीस हजार क्षमतेसाठी दहा हजार रुपये इतके वार्षिक शुल्क आकारले जाईल जाणार आहे.

कोकणात आपल्या आंबा काजू फणस बागेमध्ये वायनरी सुरू करण्यासाठी सहजपणे परवानग्या यापुढे मिळतील असे अभिप्रेत आहे.

       हा जागतिक मान्यता असलेला फळप्रक्रिया उद्योग असल्यामुळे कोकणात या उद्योगाला फळप्रक्रिया उद्योगाचा दर्जा द्यावा, कोकणातील वाईन सहजपणे कोकणातील पर्यटन केंद्रांवर विक्री  करता यावी याकरता सोपे नियम बनवले आहेत.

      या धोरणात्मक बदलांमुळे कोकणामध्ये वाईनरी उद्योगाचा ग्लोबल व्यवसाय विकसित होऊ शकेल. केवळ मोठ्या गुंतवणार गुंतवणूकदाराने येऊन मोठे उद्योग उभारण्यापेक्षा छोट्या-छोट्या वायनरी कोकणातील प्रमुख पर्यटन केंद्रांवर विकसित व्हाव्यात असा समृद्ध कोकण सवयीचा प्रयत्न आहे. याकरता माधव महाजन प्रियांका सावे नीलेश लेले  हे कोकणातील उद्योजक मदत आणि मार्गदर्शन करतील.

     गोव्याप्रमाणे सर्व ठिकाणी दारू विक्री, प्रत्येक बीचवर बीचसॅक आणि दारूविक्री आणि खुले दारू धोरण याला निश्‍चितच आमचा विरोध आहे. हे कोकणात असण्याची आवश्यकता नाही. मात्र  द्राक्षासव प्रमाणे 10% अल्कोहोलचे प्रमाण असलेली वाइन याची इंडस्ट्री कोकणात विकसित व्हावी, आणि फ्रान्स इटली प्रमाणे एक प्रगत वायनरी पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय केंद्र कोकण प्रदेश विकसित व्हावा
अशा स्वरूपाचे काम कोकणातील युवा उद्योजक यांना नक्की करता येईल.

संजय यादवराव
समृद्ध कोकण प्रदेश संघटना
ग्लोबल कोकण

ज्यांना कोकणात आपल्या बागेत किंवा पर्यटन प्रकल्पात वायनरी प्रकल्प सुरू करायचा आहे त्यांनी कृपया हा गुगल फॉर्म भरा.


To Top