विनय जोशी
सततच्या पावसामुळे केरळच्या वायनाड मध्ये कित्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन काही गावे गाडली गेली आहेत! आत्तापर्यंत १५० माणसे मृत्युमुखी आणि ३०० बेपत्ता आहेत!
डोंगराच्या माथ्यावर बेसुमार वृक्षतोड आणि डोंगर कुशीत बिंडोकपणे केलेला पोकलेनचा वापर हा या प्रकारांची सुरुवात असते. माथ्यावर केलेल्या अफाट जंगतोडीमुळे पावसाचं पाणी अंधाधुंद वाहून कुठल्या तरी खोलगट भागात साठून जातं आणि मुरत मुरत खालच्या बाजूवर दबाव टाकत राहतं. उन्हाळ्यात वर झाडांचं छप्पर नसल्याने जमीन अफाट तापते आणि पहिल्या पावसात त्यात भेगा पडतात. त्यावर मोठा पाऊस झाला की शेकडो, हजारो टन पाणी मुरत ते खालच्या अंगाला सरकत जातं.
दुसऱ्या बाजूने डोंगर उतारावर "पिक्चरस्क" लोकेशनच्या नावाने अवाढव्य आकाराची घरे, बंगले, नागमोडी रस्ते यांची बांधकामे करताना पोलकेनचा बेसुमार वापर करून, उतारावरची माती अजून शिथिल करून डोंगर अस्थिर केला जातो त्यावर वजनदार बांधकामे! माती धरून ठेवायला झाडं नाहीत कारण आता हा भाग "मागास" राहिलेला नसतो तर त्याचा "विकास" झालेला असतो!
मग ज्या दिवशी अचानक सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडतो तेव्हा डोंगर आणि पलीकडचा उतार यांची पाणी शोषून घेण्याची आणि ते पाणी झिरपू देण्याची नैसर्गिक प्रवृत्ती बिघडून जाते. वरुन पाणी जास्त प्रमाणात येत जातं पण झिरपताना त्यात मानवी बांधकामे अडथळे निर्माण करतात, परिणामी उतारावर जमिनीच्या पोटात प्रचंड वजनाचे अदृश्य पाणीसाठे निर्माण होतात. हे हजारो टन वजनाचे पाण्याचे अदृश्य साठे गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाने खाली खाली सरकताना सोबत दगड, उरली सुरली झाडे आणि बांधकामे यांना घेऊन जातात आणि वायनाड सारखी घटना घडते.
कोकणात मंडणगडच्या अलीकडे शेनाळे गावात काही वर्षांपूर्वी प्रचंड भूस्खलन होऊन मोठा रस्ता वाहून गेला होता. सुदैवाने उतारावर वस्ती नसल्याने मनुष्यहानी झाली नाही तो प्रकार पठारावर पाणी साठून झाला होता.
सी फेसींग बंगलो स्कीम- आज वायनाड उद्या कोकण!
अख्ख्या कोकणात, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिथे जिथे डोंगरावरून समुद्र दिसतो, अशा सर्व जागा आज "एनए प्लॉटिंग" उद्योगाने स्वाहा केलेल्या आहेत. या सर्व पठारांवर बेसुमार वृक्षतोड करून जमिनीच्या मूळ रचनेत सुरुंग लावून किंवा पोकलेन वापरून अभूतपूर्व आणि बिनडोक बदल केलेले आहेत. पाण्याचे मूळ प्रवाह वळवून किंवा बुजवून त्यात बांधकामे झाली आहे. उभ्या डोंगराचा "स्लाईस" काढून त्यावर बंगलो उभे राहत आहेत. अशा पठारावरून खाली सुंदर, निळाशार समुद्र दिसतो, पण त्याचवेळी खाली डोंगर उतारावर असलेली वस्ती ही एका धोक्याच्या दिशेने इंच इंच सरकत असते.
या दोन्ही जिल्ह्यात समुद्रापासून एक ते तीन किलोमीटरवर असलेल्या सगळ्या डोंगर पठारावर हीच स्थिती आहे त्यामुळे या प्रत्येक ठिकाणी कमीत कमी एक "वायनाड" कधी ना कधी होणार आहे!
आपल्या हातात काय आहे?
सध्यातरी आपल्या हातात फक्त बातम्या वाचणे आणि सुस्कारे सोडून गप्प बसणे इतकाच विषय आहे! आपल्या वडिलोपार्जित जागा आपण विकलेल्या आहेत, कमिशन आपण घेतलेलं आहे, तिथे बांधकामे आपण करत आहोत. त्यामुळे सध्या आपल्या हातात काहीही नाही!
कुठेही मोठ्या भुस्खलनाची बातमी वाचली की मला हर्णै दापोली रस्त्यावर ४५ अंशात डोंगर कापून बांधलेल्या बंगलो स्किमची दृश्य डोळ्यासमोर येतात! हे फक्त एक उदाहरण नाही तर कोकणात समुद्र सान्निध्यात असलेला एकेक डोंगर अशा शेवटच्या घटका मोजत आहे! महसूल अधिकारी, बिल्डर, इस्टेट एजंट, कंत्राटदार प्रत्येक जण आपापल्या परीने या डोंगरांना वायनाडच्या दिशेने इंच इंच सरकवत आहेत!
भूस्खलन होऊन खालची कोकणी गावे गाडली गेली की योग्य आणि चांगली नुकसानभरपाई मिळवण्याचे प्रयत्न करणे इतकंच आपल्या हातात आहे!
---विनय जोशी