पुणे : पुणे पोलिसांनी कोथरूड भागातून पकडलेल्या त्या दहशतवाद्यांना आश्रयासाठी आर्थिक मदत करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. यापुर्वी गोंदियामधून रूम स्वत:च्या नावावर घेऊन त्यांना देणाऱ्या व आश्रय देणाऱ्यास अटक केली होती. त्यानंतर आता या आरोपीला रत्नागिरीतून पकडण्यात आले आहे.
पुणे पोलिसांच्या कोथरूड बीट मार्शलवरील कर्मचाऱ्यांनी गस्तीत दुचाकी चोरीच्या संशयातून मोस्ट वॉन्टेड दहशतवादी महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय २३), महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय-२४, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा. मूळ रा. रतलाम, मध्यप्रदेश) यांना अटक केली. त्यांच्याकडून ड्रोनचे साहित्य, पांढऱ्या रंगाची पावडर, पिस्तूलाचे चामडी पाकीट, काडतूस जप्त केले आहे. याबाबत त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
एटीएसने यासोबतच दोन दहशतवाद्यांना आश्रय देण्यासोबतच आर्थिक मदत आणि सहाय्य करणाऱ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. या दोघानंतर एटीएसने पुण्यात या दोघांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा, कोंढवा) याला अटक केली.
अब्दुल हा कोंढवा भागात राहत होता. त्याचा ग्राफिक्स डिझाईनचा व्यवसाय आहे. अब्दुल पठाणने खान व साकी व फरार झालेल्या असलेल्या तिघांना ग्राफिक्स डिझाईनचे काम देतो, असे सांगितले. त्यांना दरमहा ८ हजार रुपये पगार दिला. त्याने चेतना गार्डनमधील अन्वर अली इद्रिस यांच्या मालकीची १ खोली भाड्याने घेतली. या खोलीचे साडेतीन हजार रुपये भाडे अब्दुल दोघांकडून घेत होता. तर खान, साकी या दोघांची पार्श्वभूमी अब्दुलला माहिती होती. तरीही त्याने त्यांना मदत केली. यादरम्यान, आता रत्नागिरीमधून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने दोघा दहशतवाद्यांना आश्रय घेण्यासाठी आर्थिक पुरवठा केल्याचे समोर आले आहे. त्याला चौकशीसाठी बोलवल्यानंतर चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग आढळला. त्यानूसार त्याला पकडण्यात आले आहे.
यासोबतच आणखी एकाला संशयावरून तपासासाठी नोटीस बजावली आहे. पण, तो परराज्यात गेल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे एटीएसने सांगितले आहे. तसेच, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना आणि फरार झालेल्या एकाला फरार काळात कोणी मदत केली, याचा तपास करण्यात येत असल्याचे एटीएसने सांगितले आहे
जंगलात वापरलेले टेन्ट जप्त..
पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे समोर आले होते. बॉम्बस्फोट करण्यास त्यांनी जंगलात वापरलेले तंबू (टेन्ट) जप्त करण्यात आले आहे. इम्रान खान आणि युसूफ साकी जयपूर बॉबस्फोटमधील फरार आरोपी आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) गुन्हा दाखल केल्यानंतर दोघे मार्च २०२२ मध्ये मुंबईतील भेंडी बाजार येथे पळाले. मुंबईत पकडले जाण्याच्या भीतीने दोघे पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर ते कौसरबाग भाग येथील एका मशिदीमध्ये राहू लागले. तेव्हा त्यांची ओळख अब्दुलशी झाली होती. आम्ही गरीब आहोत. कामाच्या शोधात पुण्यात आल्याचे त्यांनी अब्दुलला सांगितले होते.